पुणे : महापालिकेच्या विधी विभागात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्याच्या अनेक प्रकरणांना बेकायदेशीररीत्या शिफारसी केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंतच्या विधी विभागातील टीडीआर प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, अशी मागणी काँगेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी आज केली. महापालिकेतील आरक्षणाच्या जागेचे टीडीआर देण्यासाठी विधी विभागाचा अभिप्राय घेतला जातो. परंतु, विधी विभागाकडून टीडीआरची आवश्यक कायदेशीर तपासणी केली जात नसल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. विधी विभागाने शिफारस केलेल्या अनेक टीडीआर प्रकरणांत गंभीर बाबी आढळून आल्या आहेत. तसेच, महापालिकेच्या वतीने न्यायालयीन प्रक्रियेत बाजू मांडण्यासाठी विधी विभागाचे वकील उपस्थित राहत नाहीत. तरीही संबंधितांना मानधन व वेतन दिले जाते. या पार्श्वभूमीवर विधी विभागातील टीडीआर कारभाराची चौकशी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली करावी. त्याविषयीची मागणी आयुक्त विकास देशमुख यांच्याकडे केली आहे, अशी माहिती बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याविषयी प्रभारी विधी सल्लागार अॅड. मंजूषा इधाटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
पालिका विधी विभागातील टीडीआरची चौकशी करा
By admin | Updated: July 18, 2014 03:29 IST