पुणे : ‘अॅस्ट्रोसॅट’ या भारताच्या पहिल्या अंतराळ वेधशाळेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे कृष्णविवर, न्यूट्रीन तारे, आकाशगंगा, अतिनील किरणोत्सर्ग, क्ष-किरण, तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या ताऱ्यांचा आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ताऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. मात्र, ही माहिती प्राप्त होण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परंतु, ‘अॅस्टोसॅट’कडून मिळणाऱ्या माहिती आणि छायाचित्रांची सर्वांनाच उत्सुकता आहे, असे आयुकाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या आणि विश्वाचे सखोल आकलन व्हावे, या हेतूने भारताने श्रीहरीकोटाच्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून सोडलेल्या ‘अॅस्टोसॅट’ या अंतराळ वेधशाळेच्या विषयी आयुकाचे माजी संचालक अजित केंभावी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दीपंकर भट्टाचार्य, स्वर्ण के. घोष, वरुण भालेराव, गुलाब देवांगन, राजीव मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच या प्रसंगी सर्व शास्त्रज्ञांच्या हस्ते अॅस्ट्रोसॅटबाबत माहिती देणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. अॅस्ट्रोसॅटसाठी आयुकाच्या शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असून, येत्या सहा महिन्यांनंतर प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे आयुकामध्ये कृष्णविवर, न्यूट्रीन तारे, आकाशगंगा याचा अभ्यास केला जाईल. आयुकाचे शास्त्रज्ञ श्याम टंडन यांनी अल्ट्रव्हायलेट इमॅजिंग टेलिस्कोप तयार करण्यात प्रमुख भूमिका बजावली असून, दीपंकर भट्टाचार्य यांनी अॅस्ट्रोसॅटसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. अजित केंभावी म्हणाले, की अॅस्ट्रोसॅटमध्ये पाच दुर्बिणी असून, त्यातील चार दुर्बिणी एकाच दिशेला कमी-अधिक रेंजवर पाहू शकतात. त्यामुळे अंतराळातील विविध हालचालींचा वेध घेता येईल. अॅस्ट्रोसॅटमुळे खगोलशास्त्राची प्रगती होणार आहे. आयुकाच्या शास्त्रज्ञांनी या वेधशाळेतील विविध प्रकल्पांवर सुमारे बारा वर्षांपासून काम केले आहे. अवकाशयान सोडण्याबाबत भारताची चीनबरोबर स्पर्धा असली तरी या स्पर्धेकडे सकारात्मकपणे पाहिले जाते. भारतीय शास्त्रज्ञ चीनबरोबर काही प्रकल्पांवर काम करत आहेत.दीपंकर भट्टाचार्य म्हणाले, अॅस्ट्रोसॅटवरील पाच दुर्बिणींचे तसेच सोलर पॅनलचे काम व्यवस्थित होते की नाही, यासाठी आयुकाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांनी मिळणार ‘अॅस्ट्रोसॅट’कडून माहिती
By admin | Updated: September 30, 2015 00:58 IST