पुणे : देशात काही कोटींच्या संख्येने बिडी कामगार आहेत. त्यांच्यासाठीच्या योजना, तसेच कल्याणकारी कायद्यात बदल करू नका, अन्यथा देशभर असंतोषाचा भडका उडेल व त्यात भारतीय मजदूर संघ अग्रभागी असेल, असा इशारा भारतीय मजदूर संघाच्या वतीने केंद्र सरकारला देण्यात आला.
भवानी पेठेतील बिडी कामगारांसाठी असलेल्या दवाखान्यासमोर अखिल भारतीय बीडी मजदूर संघाच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. लक्ष्मी यांनी कामगारांचे निवेदन स्वीकारले व सरकारपर्यंत संघटनेच्या भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
संघटनेचे सरचिटणीस उमेश विस्वाद म्हणाले, सरकारने बीडी कामगारांसाठी असलेले कल्याणकारी कायदे बदलले. जीएसटी कायद्यामुळे कामगारांसाठीचे कल्याणमंडळ बंदच झाले आहे. कामगारांच्या गुणवंत पाल्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत होती, तीही बंद झाली आहे. बीडी कामगारांसाठी देशातील १७ राज्यांतून २८० दवाखाने सुरू होते. ते बंद झाले आहेत. धोरणे बदलावीत व सर्व योजना पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आंदोलनात विस्वाद यांच्यासह महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, वासंती तुम्मा, विजया लक्ष्मी येमुल सहभागी झाले होते.