लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम असली, तरी एकूण तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २० टक्क्यांच्या आत आल्याचे थोडेसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले आहे़ आज दिवसभरात ११ हजार ८९० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ३४२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ ही टक्केवारी १९़ ६९ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २३ हजार ६२ इतकी झाली आहे़ सध्या शहरात ५२४ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ९५८ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत़ आज दिवसभरात १ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ दरम्यान आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १३ लाख ३८ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३७ हजार ७३६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ९ हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६८ इतकी झाली आहे़
==========================