- संजय माने / नीलेश जंगम, पिंपरी
शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरातील बहुतांश पानटपऱ्यांवर राजरोसपणे हुक्काविक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. कॉलेजच्या युवकांबरोबर शाळेतील विद्यार्थी त्याच्या आहारी गेले आहेत. महाविद्यालयाच्या आवारात काठेही एखाद्या कोपऱ्यात जाऊन विद्यार्थी झुरके घेताना दिसून आले. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरातील लेखणीची जागा ‘हुक्का पेन’ने घेतली आहे. मात्र, याविषयी शासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पिंपरी, चिंचवड, वाकड, रावेत व हिंजवडी या भागात अनेक तरुण महाविद्यालयाच्या आवारातच सर्रासपणे हुक्क्याच्या धुरांचे झुरके सोडत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. प्रत्येक वेळी हुक्का पार्लरमध्ये जाण्यापेक्षा पेनच्या आकारातील हुक्का स्वत:जवळ बाळगणे सहज शक्य होते. सिगारेटची तल्लफ भागविण्यासाठी महाविद्यालयीन तरुण पेन हुक्क्यातून धुरांचे झुरके सोडतात. फॅड किंवा प्रतिष्ठा म्हणून अनेक तरुण हुक्का पेन ओठांना लावून धूरकांड्या सोडताना ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. वेळ दुपारी एकची, सकाळच्या शिफटमधील विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडलेले. इमारतीच्या बाहेर येताच, घोळक्याने आलेल्या काही विद्यार्थ्यांनी आडबाजुला येऊन दफ्तरातून पेनच्या आकारातील हु्क्का बाहेर काढला. एकापाठोपाठ एक असे ते पेन हुक्याचे झुरके घेऊ लागले. तोंडाने श्वास आत घेऊन, बाहेर धूर सोडला जात होता. बघणाऱ्यांनासुद्धा हा प्रकार कुतूहलाचा वाटला.लोकमत टिमनेसुद्धा हा प्र्रकार काय आहे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पिंपरीतील पान टपऱ्यांवर जाऊन पेनहुक्का मिळेल का? असे विचारले तर होकारार्थी उत्तर मिळाले. चारशे रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत त्याची किंमत आहे. त्याच्या वरील भागात तंबाखूमिश्रित द्रव्य अथवा स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला फ्लेवर असे विविध फ्लेवर बाजारात मिळतात. हे एक साधन आहे, त्यातून काय ओढायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. चायना मेड असलेलया या हुक्का पेनची किंमत चारशेपासून बाराशे रुपयांपर्यंत आहे. या पेन हुक्क्यासोबत चार्जर व एक रिफिल आणि त्यामध्ये टाकण्यासाठी (द्रव्य स्वरूपात) लिक्विड फ्लेवरची बाटली असा संच मिळतो. यामध्ये आॅरेंज, डबल अॅपल, ग्रेप्स, ब्ल्यू बेरी, पान मसाला असे विविध फ्लेवर आहेत. हे सर्व फ्लेवर निकोटिनविरहीत आहेत. मात्र, या फ्लेवरच्या द्रव्यात निकोटिन अथवा अमली पदार्थ मिसळून नशाही केली जाऊ शकते, असेही टपरीचालकाने सांगितले. ... असा आहे पेन हुक्का तीन भागांमध्ये हे हुक्का पेन तयार केले असून, ते बॅटरीवर चालते. पेनमध्ये द्रव्य स्वरूपातील निकोटिन भरले जाऊ शकते. पेन चार्ज केल्यानंतर अॅटोमायझर तापते आणि बटन दाबल्यानंतर त्यातील द्रव सिगारेटच्या धुराप्रमाणे बाहेर पडते. या पेन हुक्क्याची किंमत ४०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत आहे. हे पेनहुक्के चायनामेड आहेत.हुक्का पेन हे एक साधन...हुक्का पेन हे केवळ एक साधन आहे. द्रव्य स्वरूपात फळांचा सुगंध घेण्याची सुविधा आहे. परंतु, ज्याला जसा वापर करायचा, तसा ते करतात. टपऱ्यांमधून पेन हुक्क्याची विक्री केली जाते. पुढे त्याचा कोण कसा उपयोग करते, हे आम्ही सांगू शकत नाही. आॅनलाइन आॅर्डर नोंदवूनसुद्धा हुक्का मागवता येतो. त्यामुळे केवळ टपऱ्यांवर अवलंबून न राहता आॅनलाइन हुक्का आॅर्डर नोंदविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हुक्का पेनच्या विक्रीसाठी विविध आॅनलाइन साइट्सही उपलब्ध आहेत. २५० रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत आॅनलाइनवर पेनची किंमत आहे.चार्जर सिगारेटही बाजारातहुबेहूब सिगारेटसारखीच दिसणारी, चार्ज करता येणारी सिगारेटही बाजारात उपलब्ध झाली आहे. माऊथ फ्रेशनरसारखा सुगंध या सिगारेटच्या धुरातून येतो. तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत याची किंमत आहे. याच्या मागच्या बाजूचे फिल्टर बदलता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही सिगारेट पेटविण्यासाठी आगपेटी अथवा लायटरची गरज भासत नाही. नुसती ओठात धरायची, बटन दाबून झुरका घेतला की, ही सिगारेट पेट घेते. ज्यांना सिगारेटचे व्यसन आहे, त्यांना ते सोडण्यासाठी चार्जर सिगारेट हा एक पर्याय असल्याचा दावा विक्रेते करतात.दप्तरातही पेन हुक्कातरुणांमध्ये हुक्का ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील महाविद्यालयाच्या भागातील टपऱ्यांवर दररोज आठ ते दहा हुक्का पेनची विक्री होत आहे. हुक्का पेनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, महाविद्यालयातील तरुणांना याचा जास्त ओढा आहे. खिशात, दप्तरात अगदी सहजतेने घेऊन फिरता येईल, अशा आकाराचा हा पेन आहे. व्यसनाची सवय लागण्याची ही एक पहिली पायरी आहे. मित्रमंडळींच्या सहवासाने याच हुक्क्यात फ्लेवरमध्ये निकोटिन मिसळून नशाकेली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सिगारेटच्या व्यसनाकडेतरुण पिढी हुक्क्याच्या आहारी गेली आहे. त्यातून सिगारेटचे व्यसन लागण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. शालेय साहित्याचा भाग असलेल्या पेनाच्या आकाराचा ‘पेन हुक्का’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनाच ग्राहक म्हणून टार्गेट करण्यात आल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थिदशेतच व्यसनाधीनतेची पायरी चढायला लावणारे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.