लालुप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी देशातील सर्व स्थानकांवर कुल्हडमधून चहा देण्याची घोषणा केली होती. पण कालांतराने पुन्हा एकदा प्लास्टिक व कागदी ग्लासने त्याची जागा घेतली. नुकतेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशातील ४०० स्थानकांवर कुल्हडमधून चहा देण्याची घोषणा करत पुढील काळात सर्व स्थानकांवर ही कुल्हड बंधनकारक करण्याचे सुतोवाच केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आधीपासूनच ‘कुल्हड’मधून चहा दिला जात आहे. मात्र, प्रवाशांना कुल्हडचे बंधन नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार चहा दिला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानकातील सर्व स्टॉलवर ‘कुल्हड’ उपलब्ध आहेत. पण सध्या रेल्वे सेवा पुर्ण क्षमतेने सुरू नसल्याने प्रवासी संख्या खुप कमी आहे. त्यामुळे चहाची मागणीही मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.
-----------
लॉकडाऊनपुर्वी दररोज किमान २०० कुल्हडमधून चहाची विक्री होत होती. आता हे प्रमाण ३० ते ४० एवढेच आहे. एकुण चहा विक्रीच्या तुलनेत कुल्हडची मागणी १५ ते २० टक्के एवढीच आहे. अनेकांना कुल्हड माहिती नाही. विशेषत: तरूण-तरूणी किंवा नवीन प्रवाशांकडून कुल्हडला नकार दिला जातो. नियमित प्रवास करणारे प्रवासी आवर्जुन कुल्हडमधून चहा मागतात.
- विजय बघेल, ओम साईराम स्टॉल, पुणे रेल्वे स्टेशन
-------------
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानकासह सांगली, मिरज व कराड स्थानकात कुल्हडमधून चहा दिला जात आहे. विक्रेत्यांना स्टॉलवर कुल्हड ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग
---------------
कुंभारवाड्यातून येतात कुल्हड
पुण्यातील कुंभारवाड्यात मागील अनेक वर्षांपासून ‘कुल्हड’ तयार केले जात आहेत. तिथूनच कुल्हडची खरेदी केली जाते. जास्त कुल्हड घेतल्यास साधारणपणे दीड रुपयाला एक कुल्हड मिळते. या कुल्हडचा पुर्नवापर केला जात नसल्याने वापरलेले कुल्हड कचºयात जातात. प्रवाशांकडून कुल्हडचे अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत.
------------