लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : कोरोनावरील लस कधी येईल हे सांगता येणार नाही. पण लस हे अमृत नाही. जो पर्यंत लस येत नाही तो पर्यंत ‘मीच माझा रक्षक’ या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता ९३ टक्क्यांवर गेले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६०० दिवसांपर्यंत वाढले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कोरोनाकाळात सेवा दिलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी तसेच पत्रकारांचा विशेष सन्मान शुक्रवारी टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रोहित पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, लोहिया परिवार ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया, अभय संचेती, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, नितीन बिबवे आदी उपस्थित होते. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व या वेळी स्वीकारण्यात आले.
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कोरोनायोद्ध्यांचे योगदान आहे, असे गौरवोद्गार काढत टोपे म्हणाले, ‘मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. कोरोना काळात अनेक हात पुढे आले. सेवा देण्याचे हे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे. कोरोनाकाळात अचूक बातम्या देणाºया पत्रकारांनाही विमान कवच मिळायला हवे, त्यासाठी आग्रही राहीन.’ कोरोना काळात मृत्यू पावलेल्या २५ पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी २० हजार रुपये देण्याची घोषणा रोहित पवार यांनी यावेळी केली.
-------------