लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तळमजल्यावरील दोन दुकाने आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील ३ फ्लॅट, कार जळून खाक झाले. त्याचबरोबर वॉचमनची केबिनही जळून गेली. अग्निशामन दलाच्या जवानांनी एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझविली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रास्ता पेठेतील आपोलो चित्रपटगृहासमोरील खाऊ गल्लीजवळील मद्रासी गणपती मंदिर आहे. या मंदिराजवळील एका ४ मजली इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे ६ बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ही आग पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवरील घरांपर्यंत पोहोचली होती. आगीत वॉचमनची केबिन, तेथेच पार्क केलेली एक कार आगीत जळून खाक झाली.
इमारतीच्या तळमजल्यावर एक स्पेअरपार्ट व दुसरे चप्पलचे दुकान आहे. या दुकानातून आगीला सुरुवात झाल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.