रात्रीचा लॉकडाऊन असताना रात्री अकरा साडेअकरा वाजेपर्यंत खडकी बाजार येथील हॉटेल क्राऊन सुरू असते, तर खडकीतील अनेक चौकांत पान टपऱ्या रात्री बारा वाजेपर्यंत चोरीछुपे सुरू असतात तर खडकी बाजारातच उशिरापर्यंत दरवाजा बंद करून नॉनव्हेज चायनीजची काही हॉटेल सुरू असतात. नवीन शिवाजीनगर एसटी बस स्थानकसमोर शासकीय दूध डेअरीजवळ तर ओळीने रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत अंडा ऑम्लेट बुर्जीच्या गाड्या सुरू असतात तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा याठिकाणी या बसेसमुळे अपघात घडले आहेत, तरीसुद्धा या बसेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. शिवाजीनगर एसटी बसस्थानक शेजारीच अनेक पान टपऱ्या तसेच एक हॉटेल रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते या कडे खडकी पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील सोसायट्यांमधील काही नागरिक करीत आहेत. तरी लॉकडाऊनच्या काळात तरी पोलिसांनी या दुकानांना हॉटेल व खासगी बसेस यांना त्वरित बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------