याप्रकरणी सुनाल दिलीप झरे ( वय २१, रा. ससाणे वस्ती, हडपसर ) याला जेरबंद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: १० नोव्हेंबर २०२० रोजी सुनील रामदास गाडे ( रा. वाघोली, ता. हवेली ) हे त्यांच्या वाघोली येथील गॅरेजवर होते. सकाळी टेंपोचालकाशी झालेल्या वादावरून सुनील झरे व त्याच्या साथीदारांनी सुनील गाडे व त्यांच्या दाजींना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करून पिस्तूलामधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या वेळी त्यांनी वाहनांची मोडतोड करून दहशत निर्माण केली होती. यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
७ जून २०२१ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील हवालदार नितीन गायकवाड व दिगंबर साळुंखे यांना सुनील झरे हा हांडेवाडी चौकात येणार असल्याची माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. सुनील झरे याच्यावर यापूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्याला लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, प्रमोद गायकवाड, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे, बाजीराव वीर, निखिल पवार, रोहिदास पारखे या पोलीस पथकाने केली आहे.