याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहा वर्षांपूर्वी दि. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील वाघेश्वरी माता मंदिरातील दरवाजाचे ग्रील तोडून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्या-चांदीचे दागिने असा ९६ हजार किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल होती. तपासात अमृत पांडुरंग नानावत (वय २५ वर्षे), (रा. नांदूर ता. दौंड) आणि पोपी लूमसिंग ऊर्फ दीपक कचरावत ऊर्फ राठोड (वय ३२, रा. जेजुरी) यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यातील तिसरा आरोपी प्रमोद काळूराम ऊर्फ जीवन नानावात (वय २९ वर्षे) (रा. नांदूर) हा गेल्या सहा वर्षांपासून फरारी होता. न्यायालयाने ही त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केलेले होते.
पुणे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. याच मोहिमेअंतर्गत पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन काळे, सहा. उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे यांचे पथक फरारी आरोपींचा शोध घेत होते. या पथकास पिंगोरी मंदिर चोरी प्रकरणातील हा फरारी आरोपी केडगाव चौफुला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वेषांतर करून या पथकाने तेथे सापळा रचला होता. आरोपी पोलिसांच्या सापळ्यात आला, मात्र त्याला पोलिसांचा सुगावा लागल्याने त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करीत भांडगाव फाटा, यवत येथे मोठ्या शिताफीने पकडला.
आरोपीवर पुणे शहर व जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी आदी एकूण १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अजूनही त्याने गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याला जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत.
पिंगोरी मंदिर चोरी गुन्ह्यातील सहा वर्षांपासून फरारी आरोपीसह गुन्हे शाखेचे पथक.