पुणो : बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरच चालकाने पीएमपी बस घातल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साधू वासवानी चौकामध्ये घडली. या अपघातात एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला असून, चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गीता बाळासाहेब मुंगसे (वय 35, रा. आळंदी, केडगाव) असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर, माधुरी विनायक चिंचोरे (वय 23, रा. स्टेट बँकेसमोर, दौंड), सुषमा सुरेश मोरे (वय 27, गणोश किनारा बिल्डिंग, चर्चजवळ पुणो) या गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी बसचालक मगबूल अब्दुल रहीम शेख (वय 5क्, रा. 311 कासेवाडी, राजीव गांधी हौसिंग सोसायटी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे.
गीता या बँक ऑफ बडोदाच्या रास्ता पेठ शाखेत कमर्चारी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर त्या बँकेत नोकरीला लागल्या होत्या. त्यांना चौदा वर्षाची एक मुलगी असून, दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या 18 वर्षाच्या मुलाचा पोहायला गेला असता मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी गीता या साधू वासवानी चौकातील बसथांब्यावर बसची वाट पाहत उभ्या होत्या, त्या वेळी शेख चालवीत असलेली पीएमपी बसथांब्याच्या दिशेने भरधाव आली. गीता यांना धडक देऊन या बसने रस्ता ओलांडत असलेल्या चिंचोरे आणि मोरे यांनाही जोरात ठोस मारली. या तिघीही गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, पीएमपी प्रशासनाने शेख याला निलंबित केले असून, त्याची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल.
शेख याने हा अपघात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे घडल्याचे पोलिसांना आणि पीएमपी प्रशासनाला सांगितले होते. परंतु, पीएमपी बसची यांत्रिक तपासणी केली असता बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. शेख याची एकूण 21 वर्षाची नोकरी झाली असून, त्याने किरकोळ व जखमी स्वरूपाचे 7 अपघात केल्याचे रेकॉर्ड आहे. त्याला वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात आलेले असतानाही त्याने भरधाव बस चालवून हा अपघात
केला. (प्रतिनिधी)
चिंचोरे यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्या दौंडहून साधू वासवानी चौकातील फोटो फास्टच्या दुकानात कामाला येतात. रस्ता ओलांडत असताना त्यांना बसची धडक बसली. तर, गोखलेनगरमधील इंडस हेल्थ क्लबमध्ये नोकरी करणा:या मोरे यांच्या दोन्ही पायांना व हातांना जबर मार लागला आहे. त्यांना दोन मुली आहेत.