नववर्षाच्या पहिल्या दिवशी डाव्या कालव्याला हे पाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात सध्या ८.५३ टीमएसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उशिरापर्यंत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे विहिरी, तलाव, शेततळे पूर्ण क्षमतेने भरले होते. ओढे-नाले खळखळून वाहत होते. शेतक-यांनी या पाण्यावर कांदा लागवड, मका, बटाटा, गहू व इतर तरकारी पिकांची लागवड केली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासू लागली होती. धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खेड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. १ जानेवारी रोजी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असल्यामुळे शेतकरीवर्गाची पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी कालव्याला आल्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच कालवा गळतीचे पाणी ओढ्याना येऊन ते थेट भीमा नदीत जाणार असल्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांतील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. सध्या धरणात ९६.६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी पाणीसाठा ९६.५६ टक्के शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तेवढाच आहे. पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन जवळपास फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्या पध्दतीने धरण विभाग या पाण्याचे योग्यरीत्या वितरण करणार आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी चांगली असल्याने उन्हाळ्यातही डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी हंगामातही पिके घेता येणार असल्याचे चित्र दिसत असुन शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन ७ दिवसांपूर्वी सोडले आहे. त्यामुळे कालवा तुडुंब भरून वाहत आहे.