--
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड व किल्ले तोरणागडावर बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात आहे. हे उत्खनन करणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिवाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले राजगड व किल्ले तोरणागडावर स्वराज्यासाठी खूप मोठे काम केलेले आहे. महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यांना येथील मावळे दैवत मानत आहेत. शासनाच्या देखरेखीखाली अद्याप तरी हे किल्ले सुरक्षित आहेत; परंतु काही चुकीच्या विचारसरणीच्या लोकांमुळे या किल्ल्यांना डाग लागत आहे. पुरातत्त्व विभागाकडून साफसफाईचे कारण सांगून परवानगी घेऊन या दोन्ही किल्ल्यांवर बेकायदेशीर उत्खनन होत आहे. हे उत्खनन पुरातत्त्व विभागाच्या नाकर्तेपणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारवाईची वाट न पाहता बेकायदेशीरपणे उत्खनन करणाऱ्या संस्था किंवा लोक यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महेश कदम यांनी केली आहे. या वेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम स्वप्निल लिपाने, रमेश पवार, आकाश सुतार, नवनाथ पायगुडे आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.