शेलपिंपळगाव : बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत. हंगामातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. अन्य पिकांवर मावा, पीळ तसेच अळी रोगाची सर्वाधिक लागण झाली आहे. त्यामुळे ही बाधित पिके वाचविण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतक:यांवर आली असून, पिके वाचविण्याची त्याची धडपड सुरू आहे.
या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फुलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झाला आहे. परंतु, चालू हंगामात कांदारोपाच्या तुटवडय़ापायी बहुतांशी शेतक:यांनी फळपिकांव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका व पालेभाज्यांची लागवड केली आहे. पिकांवर
पांढरे डाग पडले आहेत.
कांद्याला करपा व मावा रोगाची सर्वाधिक लागण होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन वाढीच्या काळात त्याची वाढ खुंटली आहे, तर वाढत्या उन्हाच्या झळांचा फ्लॉवर पिकांवर परिणाम झाला आहे. लागवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच पिकाला लहान-लहान गड्डे येऊ लागले आहेत. लहान वयात लागलेले पीक म्हणजे पीक बाद झाल्याची पावती असते. परिसरात अनेक ठिकाणी पिकांची हीच अवस्था पाहावयास मिळत आहे.
रब्बी हंगामात प्रामुख्याने घेतले जाणारे ज्वारी, हरभरा, ऊस, कांदा, मका, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या आदी पिकांना अधिक पसंती दिली.
टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. पिकांना रोगराईपासून वाचवण्यासाठी शेतकरी बाजारातील महागडी रासायनिक औषधे खरेदी करून पिकावर मारत आहे; मात्र तोही प्रयत्न अपयशी होत आहे. गेल्या आठवडय़ात खेड तालुक्यासह शिरूरच्या काही भागांत पाऊस झाल्याने अनेक पिकांचे अतोनात नुकसान घडून आले. ज्वारीवर चिकटा तर मका पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवत आहे. (वार्ताहर)
दोन दिवसांपासून वातावरणात गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे. पिकांच्या वाढीच्या दृष्टीने थंडी पोषक मानली जाते. मात्र, थंडीबरोबर दव पडल्यास ते पिकासाठी अधिक धोकादायक बनते. कांदा, ज्वारी, हरभरा, पालेभाज्या (मेथी, कोथिंबीर, पालक) या पिकांना थंड वातावरण अनुकूल असते. मात्र, दोडका, भेंडी, तोंडले, दुधी भोपळा अशा वेलवर्गीय पिकांसह फळपिकांना या थंडीचा फटका सहन करावा लागतो.
- डॉ. रामचंद्र साबळे , हवामान व शेतीतज्ज्ञ
कांद्याची महागडी रोपे खरेदी करून लागवडी केल्या. मात्र, लागवडीच्या दिवसापासून ते आजर्पयत पिकाला पोषक वातावरण लाभत नसल्याने पीक अडचणीत आले आहे. त्यातच दुकानातील महागडी रासायनिक औषधे वारंवार खरेदी करावी लागत असल्याने याची आर्थिक झळ सोसावी लागते असल्याचे कचरूनाना वाजे, रमेश गोडसे, एकनाथ आवटे या शेतक:यांनी सांगितले.