पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तपासल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. मात्र, उत्तरपत्रिकेतील एकच प्रश्न दोन वेगवेगळ्या प्राध्यापकांनी तपासला असता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणांमध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासल्या जात नसल्याचे समोर येत आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे २0१५मध्ये अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील आयटीसीटी या विषयाची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासताना त्याला दोन प्रश्नांना प्रत्येकी सहा गुण दिले. मात्र, त्याचा उत्तरपत्रिकेतील एक प्रश्न तपासलाच नाही. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेतल्यानंतर ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यामुळे विद्यार्थ्याने परीक्षा विभागाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यावर दुसऱ्या मान्यताप्रात्र प्राध्यापकाने उत्तरपत्रिका तपासताना त्याच दोन प्रश्नांना प्रत्येकी १ गुण दिला. त्यामुळे प्रथमत: उत्तरपत्रिका तपासणाऱ्या किंवा दुसऱ्यांदा उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांनी डोळे झाकून गुण दिले असावेत, असे स्पष्ट होते. त्यातच एखादा प्रश्न तपासायचा राहिल्यास सर्व प्रश्न पुन्हा न तपासता केवळ एकच प्रश्न तपासून गुण द्यावेत, असा संकेत आहे. मात्र, या विद्यार्थ्याचे सर्व प्रश्न तपासले गेले. प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासताना हलगर्जीपणा केल्यास संबंधित प्राध्यापकाला नोटीस बजावून कारवाई करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक प्राध्यापकाला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. हे खरे असले; तरी काळजीपूर्वक तपासणी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. त्यामुळे प्राध्यापकांनी डोळ्यांत तेल घालून बारकाईने उत्तरपत्रिका तपासावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला प्राध्यापकांनी योग्य गुणदान करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींमुळेच हलगर्जीपणाने उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबत खूपच हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत असल्यास संबंधित उत्तरपत्रिका दुसऱ्या विद्यापीठातील प्राध्यापकांकडून तपासून घेतली जाईल.- डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
उत्तरपत्रिका तपासणी डोळे झाकून ?
By admin | Updated: February 13, 2016 03:17 IST