---
मार्गासनी : वेल्हे तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा व पाऊस आल्याने तालुक्यातील आठ खांब कोसळले, त्यामुळे अनेक ग्रामीण रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला व तेथील ऑक्सिजनसह अनेक वैद्यकीय उपकरण ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचे गांभीर्य ओळखून महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांब उभे करून रुग्णालयातील वीज पुरवठा काही तासांत सुरळीत केला. त्यामुळे येथील रुग्णांवरील उपचार सुरळीत झाले.
वेल्हे तालुक्यालती गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज संध्याकाळी जोरदार वारा, विजांचा कडकडाट व गारांचा पाऊस पडत आहे. दोन मे रोजी झालेल्या वादळी पावसामध्ये दापोडे, विंझर, वांजळे, मालवली, शिरगाव येथील विजेचे खांब कोसळले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता. सध्या या परिसरातील कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते व प्रसंगी विजेअभावी त्यांच्या जिवावरही बेतू शकते. मात्र, पडलेले आठ खांब पुन्हा उभा करून विजेच्या तारा त्यांच्यावरून ओढून वीजपुरवठा सुरळीत करणे हे काम तातडीने होणे कठीण होते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखत महावितरणाने शक्कल लढविली आणि या परिसरातील झाडांचा वापर विजेच्या पोलसारखा करत त्यांच्यावर विजेच्या तारा नेत एका दिवसाच्या आत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
पाबे, दापोड, विंझर, वांजळे या परिसरातील विजेचे खांब कोसळल्याने ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या दोन्ही ठिकाणी कोरोनाचे रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन देऊन तपासणी योग्य ते इंजेक्शन देणे तसेच महत्त्वाचे औषधे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी विजेची गरज असते. ती जर दोन तीन दिवस खंडित राहिली असती, तर खूप मोठे संकट आले असते ते संकट केवळ महावितरणच्या उत्तम आणि तत्पर निर्णयाने टळले आहे.
- डॉ. परमेश्वर हिरास,
फोटो क्रमांक - महावितरण दापोडे (ता. वेल्हे) येथील विजेचे खांब कोसळल्याने शेजारी असलेल्या झाडांना तारा बांधून वीज प्रवाह सुरळीत केला.
--
चौकट
वेल्हे येथे ग्रामीण रुग्णालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन बँक आधी प्रशासकीय कार्यालय वेल्हे या ठिकाणी आहेत कोरोना रुग्णांच्या दृष्टिकोनातून वीजप्रवाह सुरू करणे आवश्यक होते, त्यामुळे कोसळलेल्या विजेच्या खांबाशेजारी असलेल्या झाडांना सुरक्षित तारांचे कनेक्शन देऊन रुग्णालय व आदी परिसरातील वीज प्रवाह सुरू करण्यात आला.
- संतोष शिंदे,
सहायक अभियंता, वेल्हे