खेड तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुका दोन टप्यात घेण्यात येणार होत्या मंगळवारी ९ फेब्रुवारीला ६० तर १० फेबुवारीला ३० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुका घेण्यासाठी महसुल प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती २९ जानेवारीला काढण्यात आल्या असताना या आरक्षणाबाबत चाकण औद्योगिक पट्यातील काही ग्रामपंचायतीनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. ५ फेब्रुवारी ला यावर न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी मांडण्याबाबत निर्देश देत सरपंचपदाच्या निवडीला स्थगिती दिली होती.
गेले तीन दिवसापासून या बाबत महसूल विभागाने भाष्य न केल्याने ज्यांनी पिटिशन दाखल केल्या त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड स्थिगित करणार का ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम स्थगित ठेवणार याबाबत कोणतेही निर्देश न मिळाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता. मात्र असे असताना महसूल विभागाने सरपंचपदाच्या निवडणुकीचे नोटीस देऊन नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना अलर्ट केले होते. त्यामुळे ९० ग्रामपंचायतीच्या राजकीय सहलीवर गेलेल्या सदस्यांचा जीव भाड्यांत पडला असतानाच परतीचे वेध लागलेल्या सदस्य मंडळीना जिल्हाधिकारी यांच्या हाती आलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा आठ दहा दिवसाचा वनवास भोगावा लागणार आहे.
खेड तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या दोन टप्यातील होणा-या निवडणुक प्रक्रीया जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १६ फेबुवारीपर्यत रोखण्यात आल्या असुन पुढील निर्देशानुसार सरपंचपदाच्या निवडणुक तारखा जाहिर करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.