लोकमत न्यूज नेटवर्कभोर : शहरातून व ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ओमनीसह इतर गाड्या, रिक्षांची व एसटी स्टँडवर खाजगी वाहतूक करणाऱ्या जीप गाड्यांची वाहतूक अनियमित जादा विद्यार्थी व प्रवासी घेऊन केली आहे. अवैध वाहतुकीच्या नावाखाली संपूर्ण वाहतुकच भोर पोलिसांनी बंद केली आहे. यामुळे नोकरी व्यवसाय करणारे, पालकांना मुलांना शाळेत सोडता न आल्याने मुलांची शाळा बुडत आहे. मुले चालत शाळेत जात नसल्याने अनेक शाळांत विद्यार्थी उपस्थिती कमी होत आहे. तर अवैध वाहतूक करणाऱ्या जीपगाड्या अचानक बंद केल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.जीप, रिक्षाचालक मालकांवर उपासमारीची वेळ तर पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू असलेली अवैध वाहतूक नेमकी कशामुळे बंद करण्यात आली, याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.भोर तालुक्यात पुणे-मुंबई, भोर-शिरवळ, भोर-नसरापूर, भोर-निगुडघर, भोर-वेळवंड, भोर-आंबाडे अशा लोकल मार्गांवर सुमारे ३५० ते ४०० खाजगी पण अवैध वाहतूक करणाऱ्या जीपगाड्या आहे. दररोज सुमारे चार ते पाच हजार प्रवाशी प्रवास करतात. भोर शहरातील व ग्रामीण भागातील प्राथमिक व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना ९० ते १०० ओमनीसह इतर स्कूलव्हॅन, रिक्षातुन शाळेत ने-आण करतात. या सर्वच गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरतात. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भरून प्रवास करतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परमिट नाही, सुरक्षितता नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीच्या नावाखाली वरिष्ठांच्या आदेशानुसार मागील दोन दिवसांपासून भोर पोलिसांनी संपूर्ण वाहतूक सेवाच बंद केली आहे.शाळेत नेणाऱ्या गाड्या अचानक बंद केल्याने नोकरी, व्यवसाय करणाऱ्या पालकांना पाल्याला शाळेत सोडता येत नाही. अनेकांनी रजा टाकून किंवा अर्धवेळ करून यावे लागते. अनेक शाळा खासगी गाडीने येणाऱ्या विद्यार्थ्यांवरच अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसत आहे. पालकांना आपला कामधंदा सोडून मुलांना शाळेत सोडणे-आणणे करावे लागत आहे. अनेक मुले पर्यायी व्यवस्था नसल्याने चालतच येतात. मागील दोन दिवसांपासून अत्यंत हाल सुरू असून विद्यार्थी, पालक व गाडीचालक मालक नाराजी व्यक्त करित आहेत. तर सुमारे ४५० खाजगी अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या अचानक बंद झाल्याने पण एसटी महामंडळाने तशी कोणतीच जास्तीची पर्यायी व्यवस्था नसल्याने सामान्यांचे मोठे हाल होत आहेत.व्यावसायीकांवर उपासमारीची वेळभोर शहरातील औद्योगिक वसाहती बंद झाल्याने व शेतीवर अवलंबून राहण्यासारखी परिस्थती नसल्याने भोर शहरातील व ग्रामीण भागातील तरुणांनी जीप गाड्या व ओमनीसह इतर वाहने व रिक्षा घेऊन खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. मात्र भोर पोलिसांनी कोणताच पर्याय न काढता अचानक वाहतूक बंद केल्याने सुमारे ४५० जीप व १०० ओमनीसह इतर गाड्या व रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत. याकडे शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. वाहतूककोंडीत वाढकामधंदा सोडून पालकांना मुलांना शाळेत ने-आण करावी लागत असून शाळा सुटल्यावर शाळेसमोर वाट पाहत बसावे लागते आहे. शाळा सुटल्यावर गर्दीतून आपल्या मुलाला शोधून आणावे लागत असून मागील दोन दिवसांपासून पालकांचा हाच दिनक्रम सुरू आहे. यामुळे भोर-पुणे रस्त्यावर आणि शहरातील सर्वच शाळांसमोर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यातून एखादा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शासनाच्या सर्व नियमांनुसारच विद्यार्थ्यांची व प्रवाशांची वाहतूक करावी, त्याचे परमिटचा असावे. हे नियम पाळले जात नसल्याने अगोदर सूचना देऊन वरिष्ठांच्या आदेशानुसारच अवैध वाहतूक बंद करण्यात आली आहे. - श्रीकांत खोत, पोलीस निरीक्षक, भोर शासनाच्या नियमानुसारच विद्यार्थ्यांची वाहतूक केली पाहिजे. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पहिजे. चांगल्या स्थितीतील वाहने पाहिजेत. मात्र भोर तालुका दुर्गम व डोंगरी असून येथील पालकांची परिस्थती नसल्याने आणि मर्यादित विद्यार्थी घेऊन जाणे परवडत नाही. शाळांना स्वत:ची वाहतूक व्यवस्था करता येईल. मात्र शासनाने चालक व पालकांचा विचार करून मध्यममार्ग काढावा.- दत्तात्रय साळवी, अध्यक्ष, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, भोर
भोर शहरातील खासगी वाहतूक बंद
By admin | Updated: July 3, 2017 02:19 IST