भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व अस दोन भाग पडत असून, पश्चिम भागात निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे, आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे पश्चिम पट्यातील निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र, मागील दहा-बारा दिवसांपासून पाऊस नसल्याने भाताची रोपे पिवळी पडून खराब होत चालली आहेत. तर चक्क ऊन पडल्यामुळे खाचरात वड्या पडून भाताच्या लागवडी रखडल्या आहेत. लावलेले भात वाळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
दरम्यान, पूर्व भागातील पुणे-सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, विसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावर भाताच्या बियाणांची पेरणी केली आहे. भाताच्या रोपांची उगवण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र, सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे पिवळे पडत आहे. रोपे खराब होऊ लागली आहेत. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, असे कुरुंजी येथील शेतकरी माऊली नलावडे यांनी सांगितले.
चौकट
भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर असून, भात हे प्रमुख पीक आहे. सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टवर भाताच्या रोपांची लागवड केली होती. मात्र, पाऊस गायब झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात भातलावणी पावसाआभावी रखडली आहे. लावलेले भात आणि भाताचे तरवे पाणी नसल्यामुळे सुकू लागले आहेत. पावसाची अशीच आवस्था राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढाऊ शकते अशीच स्थिती आहे.
भोर : तालुक्यातील भुतोडे खोऱ्यात पिवळे पडले भाताचे तरवे.