पिंपरी : म्हाडा गृहप्रकल्पाच्या इमारत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोरवाडी पिंपरीत एकूण ८८३ सदनिका बांधण्यात येणार आहेत. पिंपरीगावात नवमहाराष्ट्र विद्यालयामागे २२ मजली टॉवर उभारून त्यात ३१९ सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिवाय चाकण, म्हाळुंगे येथील १४५० घरांचा गृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यातील अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या ४४८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये या गृहप्रकल्पातील घरांसाठी आॅनलाइन अर्ज मागवून सोडत पद्धतीने सदनिकांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पिंपरी-चिंचवडमध्ये १५ वर्षांपूर्वी संत तुकारामनगर येथे आणि १२ वर्षांपूर्वी मोरवाडी येथील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये म्हाडाने गृहप्रकल्प उभारले आहेत. मध्यंतरीच्या काळात शहरात खासगी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प साकारले. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये घर घेणे सामान्यांना परवडत नव्हते. तसेच अनेक इमारती अनधिकृत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्या जमीनदोस्त केल्या. त्यामुळे सुरक्षितता, किमती आवाक्यात असलेल्या म्हाडाच्या घरांची नागरिकांना प्रतीक्षा आहे. म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असणारे अनेकजण कार्यालयात जाऊन नावनोंदणी करू लागले आहेत. अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट अशा पद्धतीने घरांचे वितरण केले जाणार आहे. मोरवाडीतील प्रकल्पात ८८३ घरे बांधली जाणार असून, त्यामध्ये ३७८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी, ३३९ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि १६६ घरे उच्च उत्पन्न गटासाठी असतील. पिंपरीगावात २२ मजली टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यात ३१९ सदनिका असतील. त्याचबरोबर या प्रकल्पात व्यापारी गाळेही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बी. जी. शिर्के कंपनीला या गृहप्रकल्पाचे काम देण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधकाम केले जात आहे. (प्रतिनिधी)
म्हाडाच्या सदनिकांची सप्टेंबरमध्ये सोडत
By admin | Updated: August 13, 2015 04:37 IST