पुणे : कोरोनामुळे घ्यावे लागत असलेले ऑनलाइन शिक्षण, बारावीच्या परीक्षेबाबतचा संभ्रम आणि सीईटी परीक्षांसदर्भातील अनिश्चिततेमुळे सध्या बारावीचे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. तसेच, सीईटीच्या अभ्यासाबाबत निरुत्साही आहेत. त्यामुळे शासनाने परीक्षा घेतली जाणार आहे किंवा नाही हे स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. परंतु, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षा केव्हा होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जेईई, नीट या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या असल्या, तरी त्या होणार आहेत. हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. मात्र, सीईटी संदर्भात शासनाकडून अद्याप कोणत्याही घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. तब्बल ४० टक्के विद्यार्थ्यांनी तर सीईटी परीक्षा द्यायचीच नाही, असा निश्चय केल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
राज्यातील महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाते. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. परंतु, बारावीच्या परीक्षेला विलंब झाल्याने सीईटीचा अभ्यास करावा की बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करावा, या द्विधा मनस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे.
--
यंदा सीईटी परीक्षा होणारच नाही केवळ इयत्ता बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच प्रवेश मिळेल, असा समज काही विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. परिणामी, सुमारे चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीचा अभ्यास करण्याचे सोडून दिले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांमध्ये सीईटीबाबत निर्माण झालेला संभ्रम लवकर दूर करण्याची आवश्यकता आहे.
- केदार टाकळकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक
--
नीट, जेईई आदी परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी गांभीर्याने करताना दिसतात. परंत, सीईटी परीक्षेबाबत अभ्यास करणारे विद्यार्थी सध्या निरुत्साही झाले आहेत. परीक्षा होणार की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. शासनाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याशिवाय विद्यार्थी परीक्षेची तयारी सुरू करतील, असे वाटत नाही. त्यामुळे शासनाने सीईटीबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
- दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यासक