पुणे : भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून, अर्भक मृत्युदरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बाळ वर्षभराचे होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ४५ बालके दगावतात. तर ३० दिवसांचे वय होण्यापूर्वीच हजार बालकांमध्ये ३० चिमुकली दगावतात. अशाप्रकारे जन्माला येऊन मृत्यूला कवटाळण्याची वेळ येत असेल तर ते आपल्या आरोग्यव्यवस्थेचे अपयश आहे. अशाप्रकारे होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी नवजात अर्भकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी भारतीय बालरोग संघटनेतर्फे दहासूत्री कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे बालरोग संघटनेचे २०१६चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. भारतात कमी वजनाची बालके, मुदतीपूर्व जन्मलेले बालक यांच्या मृत्यूचा दर २० टक्क्यांहून अधिक आहे. तर हृदयविकार, मणक्याची समस्या, मेंदूतील समस्या किंवा पोटाच्या आतड्यांचे त्रास यामुळे जन्मल्यानंतर अतिशय कमी कालावधीत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण ५ ते ६ टक्के इतके आहे. मातांमधील कुपोषण हे ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. मातेचे लहान वय आणि योग्य ते पोषण न झाल्याने उद्भवणारी स्थिती यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर शहरी भागात याच्या उलट परिस्थिती असून, अतिपोषण आणि मूल उशिरा होण्याने मृत्युदर जास्त असल्याचे दिसते. याविषयी डॉ. जोग म्हणाले, उपजत मृत्यूंचा अभ्यास केला असता अर्भक मृत्यूचे विदारक वास्तव पुढे आले आहे. ३० दिवसांचे वय होण्यापूर्वी हजारात ३० तर ७ दिवसांचे वय होण्यापूर्वी २० आणि २४ तास होण्यापूर्वीच ७ चिमुकले वर्षाला दगावतात. यासाठी चिमुकल्यांमध्ये जन्माच्या वेळी होणारा जंतुसंसर्ग, जन्मत:च नातेवाइकांकडून हाताळणे, जन्माच्या वेळी बाळ गर्भातच गुदमरणे, आई कुपोषित असणे अशी कारणे दिसून येतात. त्यामुळे नवजात शिशूंचा मृत्युदर कमी होत नाही. यावर उपाय म्हणून दहासूत्री कार्यक्रमांचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यात जन्मानंतर अर्ध्या तासात मातेकडून स्तनपान, नाळ कापताना घ्यावयाची काळजी, व्हिटॅमिनची मात्रा देणे, गरज नसताना वैद्यकीय उपचार टाळणे, अशा विविध कारणांचा शोध घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कोवळी पानगळ रोखण्यासाठी दहासूत्री
By admin | Updated: October 26, 2015 02:02 IST