बारामती : बारामती तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये आता गॅसवर शिजवलेला पौष्टिक आहार चिमुकल्यांना मिळणार आहे. तालुक्यातील ४१५ अंगणवाड्यांना गॅसजोड मिळणार आहे. यासाठी अंगणवाड्यांचे प्रस्ताव जमा करणे सुरू केले आहे.वाघळवाडी-निंबूत येथील उद्योजक आर. एन. शिंदे यांनी अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने अंगणवाड्यांना गॅसजोड देण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात चर्चादेखील झाली आहे. वाणेवाडी येथे काही दिवसांपूर्वी ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत महाराजस्व अभियान पार पडले. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. पारंपरिक चूल किंवा स्टोव्ह या साधनांचा वापर करून हे पदार्थ तयार केले जात होते. या अंगणवाडी सेविकांना गॅसजोड मिळाल्यास पदार्थ लवकर बनवणे शक्य होईल. ही बाब उद्योजक शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील २८ अंगणवाड्यांना गॅसजोड देण्याचे मान्य केले. यासंदर्भात पंचायत समितीचे सभापती करण खलाटे यांनी शिंदे यांना विनंती करून सर्वच अंगणवाड्यांना मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, प्रकल्प अधिकारी विनायक गुळवे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील ४१५ अंगणवाड्यांना गॅसजोड देण्याचे शिंदे यांनी जाहीर केले.१७४ प्रस्ताव दाखलयासंदर्भात आतापर्यंत डोर्लेवाडी, होळ १, होळ ३, पणदरे १, पणदरे २, सांगवी १, सांगवी २ यांचे १७४ प्रस्ताव मिळाले आहेत. राहिलेल्या अंगणवाड्यांनी देखील पर्यवेक्षकांकडे किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे २६ जानेवारीच्या आत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत प्रशासन व बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविकांचा त्रास कमी होणार आहे. तसेच बालकांना चांगले शिजवलेले अन्न मिळणार आहे. अन्नाचा दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कुपोषणमुक्तीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. राहिलेल्या अंगणवाड्यांना प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले आहे. दोन-तीन दिवसांमध्ये प्रस्ताव दाखल होतील. मदती संदर्भात बँकांशी बोलणी सुरू आहेत.- राजनंदिनी भागवत, गटविकास अधिकारी, बारामती
चिमुरड्यांचा आहार आता गॅसवर
By admin | Updated: January 15, 2016 04:01 IST