किल्ल्यावरील पुरातत्त्व खात्याचे किल्लेदार बापू साबळे हे सकाळी किल्ल्यावर पाहणी करत असताना हे घडल्याचे निदर्शनास आले. कोरोना कालावधीमध्ये संचारबंदी असताना शिवराज्यभिषेक दिनी किल्ले तोरणा व किल्ले राजगडावर शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली होती. या किल्ल्यावर जाण्यासाठी गडांच्या चोहोबाजूने वाटा असल्याने अनेक पर्यटक किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी येत असतात. तोरणा किल्ल्यावर दोनशे ते अडीशचे पर्यटक किल्ल्यावर होते. त्यापैकी काही जण रात्री किल्ल्यावर मुक्कामी होते. याची माहिती किल्लेदार बापू साबळे यांनी दिली. ते म्हणाले, दि. ५ रोजी किल्ल्याची पाहणी करून गडावरून खाली येताना किल्ला सुस्थितीत होता. परंतु आज सकाळी गडाची पाहणी करताना बुधला माचीकडे जाणारा कोकण दरवाजामार्गावरील कोकण बुरुजाच्या दगडी, तसेच पायाखालील दगडी फरश्या, उभ्या भिंतीच्या दगडी उपद्रवी पर्यटकांनी पहारीच्या साहाय्याने पाडल्या असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालकांना याबाबत माहिती दिली असल्याचे साबळे यांनी सांगितले.
किल्ले तोरणा व राजगडावर सुटीच्या दिवसांबरोबर दररोजही शेकडो पर्यटक येत असतात. किल्ल्यांवर येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु किल्ल्यांवर आलेल्यांची नोंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे असा प्रकार घडल्यास उपद्रवी पर्यटकांवर कारवाई करणे सोपे जाईल, असे गोरक्ष भुरुकचे स्थानिक नागरिक विकास गायखे म्हणाले.