पिंपरी : भाजीमंडईतील अस्वच्छता, अतिक्रमणे, पावसामुळे झालेली दलदल यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भाजी मंडईतील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामुळे मंडईबाहेरील परिसर मोकळा झाला. पिंपरी भाजी मंडईत शहर व परिसरातील अनेक नागरिक खरेदीसाठी येतात. मंडईत भाजीखरेदीसाठी येणारया नागरिकांना मंडईपर्यंत पोहचताना करावी लागणारी कसरत यावर लोकमतने नुकताच प्रकाशझोत टाकला होता. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास कारवाईला सुरुवात करण्यात आली. मंडईतील वाहनतळाजवळील रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने हटवून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला. यामध्ये ४० शेड व १२ सिमेंटचे ओटे काढण्यात आले. भाजीपाल्यांसह सुकामेवा, चप्पल, कपडे आदींची दुकाने याठिकाणी होती. १ जेसीबी, दोन ट्रक यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. ‘ब’ प्रभागाचे ८ तर ‘ड’ प्रभागाच्या ५ कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतल्याचे प्रशासन अधिकारी भगवान बोऱ्हाडे यांनी सांगितले. कारवाईदरम्यान नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.(प्रतिनिधी)
मंडईबाहेरील अतिक्रमणे हटविली
By admin | Updated: August 2, 2014 04:18 IST