खळद : पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सासवड, राजुरी, नायगाव, रिसे, पिसे, खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज, एखतपूर-मुंजवडी, पारगाव, खानवडी, कुंभारवळण, पोमणनगर व तालुक्यात सर्वत्र दोन दिवस भीज पाऊस झाला. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असून, रस्ते, शिवार जलमय झाल्याचे दिसत आहे. राजुरी येथील शेतकरी मा. ग्रा. सदस्य रमेश भगत, सुधाकर भगत, किसन भगत, मल्हारी चव्हाण, मुक्ताजी भगत, संपत भगत, बबन भगत, वाळुंजचे संजय चौरे, राजाराम म्हेत्रे, खळदचे गणेश जाधव, राजेंद्र चव्हाण यांनी या वर्षी पावसाने ओढ दिली होती. यामुळे खरिपाच्या पेरण्याही झाल्या नव्हत्या, तर उशिरा झालेल्या थोड्या फार पावसाने रब्बीच्या पेरण्या झाल्या व कशीबशी पिके आली होती. सध्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू यांची काढणी सुरू आहे. काही भागांत शेतात काढलेली ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वैरण जशीच्या तशीच पडून आहे. अचानक आलेल्या पावसाने याचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा आंबाही चांगला बहरला होता. पण, हवामानातील बदल व अवकाळी पाऊस याने मोहोराची गळती होऊन झाडे मोकळी झाली असल्याचे दिसत आहे. शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.४मार्च महिन्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेल्या सोसायटीच्या कर्जाची परतफेड करावी लागते. यासाठी रब्बीत चांगले उत्पन्न मिळाले, तर चार पैसे शेतक ऱ्यांना मिळतात व यातून हा भरणा होतो. पण, आता पिकांचेच नुकसान झाल्याने उत्पन्नात घट होत आर्थिक फटका बसला आहे.पंचनाम्यांना सुरुवात४नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असल्याचे जेजुरी मंडल कृषी अधिकारी आर. डब्लू. नलावडे यांनी सांगितले. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आपापल्या गावोगावी नुकसानीचे पंचनामे करतील. यात कोणतेही बोगस पंचनामे होणार नाही, यासाठी मंडल, तालुका, जिल्हा, विभागीयस्तरावरूनही फेरतपासणी होणार असल्याचे सांगत एकही बोगस पंचनामा होणार नसल्याचा विश्वास दिला.ओझर : दोन दिवसांपूर्वी सलग २४ तास झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी दिले. तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, गहू, कांदा, आंबा, हरभरा, या पिकांचे नुकसान झाले. द्राक्षपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, तालुक्यात गुुंजाळवाडी, नारायणगाव व गोळेगाव या गावांमध्ये द्राक्षपीक मोठ्या प्रमाणात आहे. गोलेगावमधील द्राक्षे नुकसानापासून वाचली आहेत.तालुक्यात १५० हेक्टर द्राक्षे, १०० हेक्टर आंबा, १ हजार ५०० हेक्टर गहू, ७ हजार एकर कांदा व डांळिबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू असून कृषी व महसूल विभागांचे तलाठी, ग्र्रामसेवकांनी दि. ३ पासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात येणारे असल्याचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.
पिके, फळबागांचे अतोनात नुकसान
By admin | Updated: March 3, 2015 22:59 IST