पुणे : बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांच्या सर्व प्रिमियमवर (अधिमूल्य) येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. ६) घेण्यात आला. या सवलतीचा लाभ जे प्रकल्प घेतील त्यांना ग्राहकांव्दारे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे़ याचे स्वागत बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईने केले आहे.
सदर निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत दिली जाणार आहे, त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे़ या सवलतीचा अवाजवी लाभ विशिष्ट समूह अथवा प्रकल्पांना होऊ नये याकरिता सदर सवलत १ एप्रिल,२०२० ते अथवा चालू वार्षिक बाजारमूल्य दर तक्ता यापैकी जे जास्त असतील तेच दर अधिमूल्य आकारणीसाठी विचारात घेण्यात येणार आहेत़
यासंदर्भात क्रेडाई पुणेचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितले की, बांधकाम व्यावसायिकांना प्रिमियम मध्ये ५० टक्के सवलत मिळणार हा अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय आहे. या निर्णयामुळे मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बांधकाम क्षेत्राला नक्कीच दिलासा मिळेल. आर्थिक अडचणींमुळे गेल्या २ वर्षात अपेक्षित प्रमाणात नवीन बांधकाम प्रकल्प सुरू झाले नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्याचा बांधकाम व्यावसायिक नक्कीच विचार करतील. अर्थात या निर्णयाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याचे सखोल विश्लेषण करता येईल.