पुणे : मॉडेल कॉलनी येथील कॅनॉल रस्त्यावर सिमेंट रस्त्यासाठी खोदाई सुरू असताना १२५ मिमीच्या गॅसपाइपलाइनला जेसीबीचा धक्का लागून पाइपलाइन फुटल्याने गॅसगळती सुरू झाली. अग्निशमन दल व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या (एमएनजीएल) पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन गॅसगळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.मॉडेल कॉलनीतील कॅनॉल रस्ता येथे सिमेंटचा रस्ता टाकण्याचे काम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून केले जात आहे. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी खोदाई सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. गॅसपाइपलाइनला धक्का लागल्याने हा आवाज झाला होता, मात्र खोदाई करणाऱ्या कामगारांच्या लक्षात हा प्रकार आला नाही, जेसीबी चालकाने खोदाईचे काम तसेच सुरू ठेवले होते. काही वेळांतच सर्वत्र गॅसचा वास येऊ लागला. त्या वेळी गॅसपाइपलाइन फुटल्याचे तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आले. त्याने लगेच अग्निशमन दलास फोन करून याची माहिती दिली. अग्निशमन नियंत्रण कक्षातून एमएनजीएला घटनेची माहिती कळविली. गॅसपाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच एमएनजीएलकडून तातडीने गॅस पुरवठा थांबविण्यात आला.अग्निशमन दलाचे जवान व एमएनजीएलच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. गॅसपाइपलाइन गेलेल्या ठिकाणी त्याबाबत माइलस्टोन लावलेला असतो, तसेच वॉर्निंग मॅटदेखील टाकलेली असते, तरीही ठेकेदाराने निष्काळजीपणे खोदाई केल्याने गॅसपाइपलाइन फुटल्याची तक्रार एमएनजीएलकडून करण्यात आली आहे. जेसीबीने खोदाई न करता ती हाताने काळजीपूर्वक करणे आवश्यक होते.
मॉडेल कॉलनीत गॅसगळती रोखल्याने टळली दुर्घटना
By admin | Updated: February 12, 2016 03:41 IST