बारामती : कोरोना प्रादुर्भावामुळे बारामती शहर व तालुक्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. संक्रमण झाल्यापासून उपचार मिळवण्यासाठी रुग्णांची प्रचंड घालमेल होत आहे. या परिस्थितीची जाण ठेवून बारामतीतील एका तरुण उद्योजकाने पुढाकार घेत स्वखर्चाने पळशी गावात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात उभे राहिलेले हे पहिलेच कोविड केअर सेंटर आहे.
उद्योजक आनंद लोखंडे यांनी पळशी येथे विद्यानंद फाउंडेशनच्या वतीने ५० बेडचे कै. शोभाताई लोखंडे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. या कोविड सेंटरचे नियोजन व कामकाज व्यवस्थापकीय संचालिका प्रीती निंबाळकर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. यासाठी पळशीचे सरपंच रावसाहेब चौरमले यांची मदत झाली. तसेच सोमवारी (दि. ३) येथे रुग्णभरतीस सुरुवात झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे पथक येथे रुग्णांना उपचार देत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासन व आरोग्यसेवेची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे. बारामती शहर व तालुक्यात दररोज ३०० च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावरदेखील प्रचंड ताण आहे. बारामती शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत कोविड केअर सेंटर उभे केले. मात्र ग्रामीण भागात त्यातही जिरायत पट्ट्यामध्ये हे कोविड केअर सेंटर उभे राहिल्याने येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र वैद्यकीय आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. अशा काळात अनेक राजकीय पदाधिकारी तसेच उद्योजक वर्ग मदतीपासून अलिप्त आहे. त्यांच्यासमोर लोखंडे यांनी आदर्श घालून दिला आहे.
-------------------------------------
सध्या प्रत्येक जीव वाचवणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. अनेकांची बेडसाठी होणारी धावपळ पाहत होतो. त्यातूनच एखाद्या गावासाठी कोविड केअर सेंटर उभे करण्याची संकल्पना समोर उभी राहिली. ग्रामीण त्यातही जिरायती भागात असे कोविड केअर सेंटर नसल्याने तिथे हे सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला. आज आसपासच्या गावामध्येसुद्धा कोरोनाबाबत विद्यानंदच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
-आनंद लोखंडे
चेअरमन विद्यानंद ऍग्रो फीड्स
--------------
पळशी येथील प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर
फोटो