लोकमत न्यूज नेटवर्क
खेड शिवापूर : शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन जिल्ह्याधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यावर मोजणी करण्यात येईल असे आश्वासन रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना दिले असतांनाही सोमवारी (दि १२) प्रशासनातर्फे हवेली तालुक्यातील रहाटवडे आणि कल्याण येथे रस्त्यासाठी मोजणी करण्यात आली. प्रशासनाने आमचा विश्वासघात केला असा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आणि मोजणीला विरोध केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी अनेक आंदाेलकांना ताब्यात घेतले. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजणी थांबवण्यात आली.
प्रस्तावित रिंगरोडसाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांचा विरोध डावलून रहटावडे, कल्याण (ता. हवेली) येथे सोमवार पासून मोजणीला सुरुवात केली. फक्त हरकती मागवून पुढे कोणताही निर्णय न घेता बळाच्या जोरावर पोलीस बळाचा वापर करीत जमीन मोजणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत या मोजणीला विरोध केला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. जर आमचे काही ऐकूनच घ्या यचे नसेल व प्रकल्प दंडगाईने पुढे न्यायचा असेल तर हरकती द्या. त्या वर सुनावणी होईल अशी खोटी आश्वासने कश्यासाठी देता अशी संतप्त सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला.
१४ जून रोजी खासदर सुप्रिया सुळे ह्या रिंगरोड बाधित शेतकऱ्यांशी संवाद तथा त्यांच्या अडचणी समजून घेण्या संदर्भात आल्या होत्या. त्यावेळी सुळे यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सोबत बाधित शेतकऱ्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत ही मोजणी थांबविण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच होत नाही हे या मोजनीवरून स्पष्ट होत आहे. प्रांताधिकारी व इतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी दोन ते तीन वेळा चर्चा झाल्या. त्यावेळी सुद्धा आपल्या हरकतींचे निवेदन द्या. त्यावर जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय दिला जाईल. त्याचप्रमाणे खासदार सुळे यांनी भागातील प्रत्येक गावातील दोन शेतकरी यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्यासोबत घेऊन त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत मोजणी थांबवली जाईल असे सांगितले होते. मात्र, ह्या सर्वच भूलथापा आहेत हे सिद्ध होत आहे, असे शिवसेना हवेली तालुका प्रमुख बुवा खाटपे यांनी सांगितले. हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर त्यावेळी म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डोंगराळ भागातून रिंगरोड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू. परंतु ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक होती हे लक्षात येत आहे.
याप्रसंगी एमएसाआरडीचे अधिकारी संदीप पाटील, प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तृप्ती कोलते, तलाठी अशोक शिंदे, बुवा खाटपे, युवराज चोरघे आदी शेतकरी उपस्थित होते.
फोटो : आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतांना पोलीस अधिकारी.