पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) झाडूवाला या पदावर नियुक्त झालेल्या महिला पीएमपीची पास केंद्राची जबाबदारी सक्षमपणे पेलत आहेत. मागील सुमारे १० वर्षांपासून पीएमपीने या महिला कर्मचाऱ्यांना विश्वास दाखवून पास देण्याचे काम दिले आहे. मात्र, असे असले तरी त्यांना झाडूवाला या पदाचेच वेतन मिळत आहे. ‘पीएमपी’ने दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना मासिक किंवा त्रैमासिक पास उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे नियमित प्रवाशांना दैनिक पासही दिले जातात. हे पास देण्यासाठी पीएमपीची ठिकठिकाणी ४५ पास केंद्रे आहेत. या पास केंद्रांवर वाहकांनी पास देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांवर झाडूवाला पदावर नियुक्त असलेल्या महिला कर्मचारी काम करीत आहेत. सुमारे १० वर्षांपासून पीएमपीने त्यांच्यावर विश्वास दाखवून हे काम सोपविले आहे. या महिलाही समर्थपणे ही जबाबदारी पेलत आहेत. साधारणत: दहावीपेक्षा जास्त शिक्षण असलेल्या या महिला आहेत. वर्षानुवर्षे हेच काम करीत असल्याने त्यांना आता या कामाचा खूप अनुभव मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सहसा कुठल्याही चुका होत नाहीत. मात्र, या महिलांना अद्यापही झाडूवाल्याचेच वेतन मिळत आहेत. पास केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की मागील चार-पाच वर्षांपासून पास केंद्रावर काम करीत आहे. खूप जबाबदारीचे काम आहे. मात्र, थोडी चूक झाली तरी लगेच दंडात्मक किंवा निलंबनाची कारवाई केली जाते. कारवाईबाबत सगळे नियम आम्हाला लावले जातात; मग तसेच वेतनही का दिले जात नाही? याविषयी बोलताना पीएमपी इंटकचे उपाध्यक्ष अशोक जगताप म्हणाले, ‘‘वाहकांचे काम या महिला करीत असताना त्यांना वाहकांपेक्षा निम्माच पगार मिळतो. त्यांना वाहकांप्रमाणेच वेतन आणि सुविधा द्यायला हव्यात. तसेच त्यांना बढतीही मिळायला हवी. अनेक वर्षांपासून या महिला सक्षमपणे जबाबदारी सांभळत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.’’
पासचे काम अन् झाडूवाल्याचे दाम
By admin | Updated: April 11, 2015 05:20 IST