गिरीश खत्री हे या तरुणाचे नाव. १९८९ साली पुण्यातील कर्वेनगर परिसरात खत्री कुटुंब राहायला आले. त्यांनी नवीन घर बांधले. घराचे कर्ज आणि मुलांचे शिक्षण यासाठी वडिलांना खूप कष्ट करावे लागत होते. त्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून गिरीश यांनी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. गिरीश खत्री जुन्नर येथे मामांकडे गेले असताना जुन्या वस्तू वापरून आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. आईच्या मदतीने आठवीत असलेल्या गिरीश खत्री यांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिराशेजारी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशी फक्त नऊ रुपये इतका गल्ला होता. शिवाय पहिल्या महिन्याभरात दोन अंकी गल्ला झालाच नसल्याचे खत्री बंधू सांगतात. सुरुवातीला कधी कमी तर कधी गोड आइस्क्रिम खाणारे लोक मिळत गेले. ग्राहकाला जे आवडते तसा स्वाद ते देत गेले. ते सांगतात की, आज पुण्यात इतक्या शाखा असतानादेखील आजही आम्ही ग्राहक सांगतात ते ऐकतो. ते नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत असतात. त्यांनी धाडसाने मस्तानी आइस्क्रिम सुरू केली. लोकांना ती आवडली. खत्री बंधूंचा आज जो आइस्क्रिमचा मोठा व्यवसाय आहे. सुरुवातीला खर्च जास्त आणि मिळकत कमी होती. मात्र, वडिलांनी व्यवसाय करत राहा असा सल्ला दिला. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे व्यवसाय वाढत गेला. खत्री बंधूंच्या आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात २९ शाखा कार्यरत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, पुरंदर, बारामती या शहरांत एकूण २९ शाखा आहेत. सध्या कोरोनामुळे शाखा विस्तारण्याच्या कामात अडथळा आला असला तरी ५१ शाखा सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याकडे अनेक जण शाखेची (फ्रॅँचायझी) मागणी देखील करत आहेत.
गिरीश खत्री यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचा 'रायझिंग आयकॉन ऑफ पुणे', लोकमतचा 'बेस्ट आयकॉन ऑफ पुणे' यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.
खत्री बंधू सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी ऑनलाईन शिबिराचे आयोजन केले होते. गेल्याच महिन्यात त्यांनी दोन रक्तदान शिबिरांचेदेखील आयोजन केले होते. गरजू मुलांची शैक्षणिक फी ते भरतात. चिपळूण पूरग्रस्तांना मदत केली.