पुणे : महापालिकेचे बांधकाम व लेखा विभाग प्रमुखांच्या मर्जीतील आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने काही अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून त्याच विभागात ठाण मांडून आहेत, त्यामुळे महापालिकेच्या बदलीच्या आदेशाला सोयीस्कर वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या इतर शहरात बदलीला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे, त्यामुळे महापालिकेच्या परिपत्रकानुसार दर तीन वर्षांनंतर सेवकांच्या बदल्या करण्यात येतात. मात्र, बांधकाम, अतिक्रमण व लेखा विभागातील काही सेवकांच्या केवळ कागदोपत्री बदल्या होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बांधकाम विभागाच्या एका झोनमधील कनिष्ठ अभियंता राजेंद्र जाधव अनेक वर्षांपासून याच विभागात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांची बदली भूसंपादन विभागात करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बांधकाम विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता यांनी परस्पर बांधकाम विभागात त्यांना रुजू करून घेतले. त्यामुळे कनिष्ठ अभियंता जाधव हे सलग ७ ते १० वर्षांपासून एकच विभागात कार्यरत असल्याची तक्रार संजय आरडे व रमेश खामकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या परिपत्रकानुसार संबंधित सेवकांवर कार्यवाहीचे आदेश आयुक्त विकास देशमुख यांनी नुकतेच दिले आहेत. माहिती अधिकारातून एक प्रकरण उजेडात आले आहे; परंतु, नगरसेवक व वरिष्ठ अधिकार्यांच्या मर्जीतील कर्मचारी कागदोपत्री इतर विभागात बदलीस असले तरी पुन्हा त्याच विभागात अनेक वर्षे ठाम असतात. त्यांची वरिष्ठ अधिकार्यांपासून एजंटांपर्यंत सर्वांशी साखळी निर्माण होते. त्यातूनच अधिकारी व सेवकांकडे बेहिशेबी मालमत्तेसारख्या प्रकाराला प्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत आहे. साधारण बांधकाम, लेखा व अतिक्रमण आदी विभागाच्या बदल्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
बांधकाम, लेखा विभागात बदली
By admin | Updated: June 2, 2014 00:55 IST