पुणो : राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चाला खर्डा (जि. अहमदनगर) येथून सुरुवात झाली आहे. हडपसर येथील साधना विद्यालयाच्या मैदानात शनिवारी (दि. 28) मोर्चाचा समारोप होणार आहे, अशी माहिती एकता मंचाचे पुण्याचे निमंत्रक मोहन जोशी यांनी दिली.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर हिंदू-मुस्लीम ऐक्याला सुरुंग लावून विषमता पेरण्याचा प्रयत्न काही धर्माध शक्तीकडून केला जात आहे. त्यामुळेच खर्डा येथील नितीन आगे व पुण्यातील संगणक अभियंता मोहसिन शेख यांची हत्या प्रतिगामी शक्तीने केली. या हिंसाचाराला विरोध करण्यासाठी हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा सुरू करण्यात आला आहे.
पुणो रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी दुपारी 3 वाजता निर्धार मोर्चात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, आमदार रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. पी. ए. इनामदार, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, सुरेश देशमुख, अशोक धिवरे आदी सहभागी होणार आहेत. त्यानंतर समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)