सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे एमपीएससीच्या विविध परीक्षांसाठी एसईबीसी अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून अर्ज भरण्याची परीस्थिती निर्माण झाली. मात्र, विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज करण्याची शासनाने संधी उपलब्ध करून दिली. परंतु, एसईबीसी आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय होण्यापूर्वी शासनाने ईडब्ल्यूएसचा पर्याय का दिला? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र असलेले विद्यार्थी उत्पन्नवाढीमुळे या वर्षी ईडब्ल्यूएससाठी पात्र नाहीत. तर काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जात बदल केल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आपला अर्ज रद्द होणार का? अशी शंका काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तसेच अर्ज खुल्या संवर्गातून भरावा, एसईबीसीतून भरावा की ईडब्ल्यूएसमधून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
हनुमंत रणदिवे या विद्यार्थ्याने सांगितले, एसईबीसी आरक्षण अद्याप पूर्णपणे रद्द झालेले नाही. तरीही आयोगाने एसईबीसीएवजी ईडब्ल्यूएसचा पर्याय का दिला?, विद्यार्थ्यांनी आरक्षणसंदर्भातील माहिती प्रोफाईल व अर्जात या दोन्ही ठिकाणी? बदलायची आहे की एकाच ठिकाणी? ईडब्ल्यूएसचा पर्याय केवळ या वर्षाच्या परीक्षांसाठी असेल की यापुढील सर्व परीक्षांसाठी असेल? अशा शंका विद्यार्थ्यांच्या मनात असून याबाबत आयोगाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे.तसेच शासनाने मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागत नाही; तोपर्यंत एसईबीसी निवडीचा पर्याय खुला ठेवावा.