येरवडा : टिंंगरेनगरमध्ये राहणाऱ्या चैतन्य बालपांडे या १३ वर्षांच्या मुलाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या मुलाच्या आईचा प्रियकर सुमीत सुनील मोरे (वय २८, रा. माजी सैनिकनगर, येरवडा) याला न्यायालयाने १२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले.या प्रकरणी चैतन्यची आई राखी बालपांडे हिला आधीच अटक करण्यात आली असून, तिला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या राखीचे सुमीतबरोबर अनैतिक संबंध जुळले होते. यात अडथळा ठरत असल्याने राखी व सुमीतने चैतन्यला केलेल्या जबर मारहाणीत त्याचा बुधवारी (५ आॅगस्ट) रात्री मृत्यू झाला. या नंतर राखीला गुरुवारी (दि.६) अटक करून शुक्रवारी (दि.७) न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी सुमीत मोरेचा सहभाग आढळल्याने पोलिसांनी त्याला शुक्रवारीच रात्री अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत मारोडे यांनी दिली. (वार्ताहर)
चैतन्य खूनप्रकरण; दुसऱ्या आरोपीस कोठडी
By admin | Updated: August 10, 2015 02:38 IST