पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) वर्कशॉप, डेपो, गॅरेज येथील गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा श्रीकर परदेशी यांनी तयार केलेला प्रस्ताव गुंडाळण्याची तयारी पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. श्रीकर परदेशींनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय बदलण्यावर पीएमपीच्या काही अधिकाऱ्यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे.खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून पैसे मिळवून वर्कशॉप, डेपो येथे सीसीटीव्ही उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वर्कशॉप, डेपो येथील गैरकारभारांवर या सीसीटीव्हींच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार होता. त्याबाबतचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले होते. कॅमेरे बसविण्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये उपसचिवपदी बदली झाली. परदेशींनी पदभार सोडताच पीएमपीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक गट पुन्हा सक्रिय झाला आहे. परदेशी यांनी घेतलेले त्रासदायक निर्णय बदलण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.काही अधिकारी-कर्मचारी सह्या करून निघून जात होते. निकृष्ट दर्जाची स्पेअरपार्टची खरेदी करणे, मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या ड्युट्या देणे, स्पेअरपार्टची चोरी होणे अशा प्रकारांना सीसीटीव्हीमुळे चांगलाच आळा बसू शकणार होता. मात्र हा प्रस्ताव गुंडाळण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
पीएमपीच्या वर्कशॉपमध्ये सीसीटीव्ही प्रस्ताव गुंडाळला
By admin | Updated: May 18, 2015 05:47 IST