लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : शिंदे (ता. खेड) येथील टेमगिरेवस्ती येथे सध्या राहत असलेल्या १७ वर्षीय युवतीचा प्रात:विधीसाठी गेली असता, तीक्ष्ण हत्यारांनी मानेवर व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद मुलीचे वडील बालाजी वाघमारे (सध्या रा. शिंदे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. चाकूर, जि, लातूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. शीतल वाघमारे (वय १७) असे वार करून खून झालेल्या युवतीचे नाव आहे. चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मुलीच्या मूळ गावाला अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी माहिती निष्पन्न होणार असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून चाकण पोलिसांत अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे आणि चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप आणि त्यांचे सहकारी करीत आहे.
युवतीचा निर्घृण खून
By admin | Updated: June 27, 2017 07:38 IST