पुणे : पदपथावर लावलेल्या टपरीवर कारवाई न करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील दोन सहायक अतिक्रमण निरीक्षकांना सापळा रचून अटक करण्यात आली.
रुतिक बाळासाहेब वाळके (वय २०) आणि विलास शिवाजी अभंगे (वय २८) असे अटक केलेल्या सहायक अतिक्रमण निरीक्षकांची नावे आहेत.
तक्रारदार यांची विमाननगरातील पदपथावर टपरी आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई टाळण्यासाठी वाळकेने ४ हजार रुपयांची लाच मागितली तर अभंगेने त्याला प्रोत्साहन दिले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा लावून ४ हजार रुपयांची लाच घेताना ८ जानेवारीला रुतिक वाळकेला पकडण्यात आले.
वाळके आणि अभंगे यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास एसीबीचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करत आहेत.