लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : रविवारच्या सुटीनिमित्त वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास भुशी धरण ते कुमार चौक अशी साधारण सहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या सलग रांगा लागल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलीस सर्वच हवालदिल झाले होते.मागील सोमवारी लोणावळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने पुढील सर्वच दिवस लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होती. आज मात्र तिने उच्चांक गाठल्याने राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या दोन-तीन पदरी रांगा लागल्या होत्या. भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल सहा किमी अंतरापर्यंत रांगा लागल्याने संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता. धरणावर पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक नव्हती. लायन्स पॉइंटचा परिसर पर्यटकांनी खचाखच होता. जोरदार कोसळणाऱ्या सरी, सर्वदूर पसरलेले धुक्याचे काहूर व वाहतूककोंडी असे चित्र लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळांवर होते. खंडाळ्यातील राजमाची गार्डन, सनसेट पॉइंट, ड्युक्स नोज परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.सर्वदूर कोंडीच कोंडीलोणावळ्यात आज पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वदूर वाहतूककोंडीच कोंडी झाली होती. शहरात वाहतूक नियंत्रणासाठी ७० पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात होते. मात्र रस्त्यावर भुशी धरण ते लोणावळा शहरापर्यंत वाहनांची सलग रांग असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. पार्किंगअभावी पर्यटक रस्त्यावर कोठेही कशीही वाहने उभी करीत असल्याने कोंडीत भर पडली होती.भाजे लेणी : कोंडी टाळण्यासाठी मोठ्या वाहनांना बंदीकार्ला : कार्ला-भाजे परिसरात चांगला पाऊस पडत असून, भाजे येथील धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला असून, आज रविवार सुटीचा दिवस असल्याने कार्ला-भाजे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. वाहतूककोंडी टाळण्यासाठी कार्ला-भाजेकडे जाण्यास मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. पर्यटकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, तसेच भाजेकडे जाण्याच्या मार्गावर रेल्वे स्टेशनचे गेट व एक्सप्रेस वेचा ब्रिज ओलांडूनच जावे लागते. या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, वाहतूककोंडीमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर काही परिणाम होऊ नये, तसेच स्थानिक रहिवाशांनाही वाहतुकीचा काही त्रास होऊ नये म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मळवली-कार्ला रस्त्यावर मोठ्या बस व वाहतुकीस अडथळा होईल, अशा वाहनांना भाजेकडे जाण्यास बंदी करण्यात आली होती. ही सर्व वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. ही बंदी दर शनिवार, रविवारी असणार आहे. तसेच सायंकाळी पाचनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून सर्वच वाहनांना भाजेकडे जाण्यास बंदी असणार आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस आर नेरूरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पवन मावळ परिसरात पर्यटकांची मांदियाळीयेळसे : सलगच्या शनिवार व रविवार सलग दोन सुट्या आल्याने पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, बेडसे लेणी, श्रीक्षेत्र दुधिवरे, गुरू गांव अशा अनेक ठिकाणी पर्यटक आनंद घेण्यासाठी आले असून, शनिवारी व रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यटक भिजण्याचा आनंद पवना धरण परिसरात घेत आहे.आंबेगाव येथील धबधब्यावर भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. त्याबरोबरच पर्यटकांच्या गर्दीने परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गजबलेली दिसत आहेत. पण पवना धरण परिसरात पोलीस बंदोबस्त नसल्याने हुल्लडबाजांची चांगलीच मजा झाली. मध्येच गाडी लावून साउंडचा मोठा आवाज करून नाचत बसणे त्यामुळे स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी मोठी रस्ता कोंडी झाली होती. याचा त्रास स्थानिक नागरिकांना मोठा सहन करावा लागत आहे.पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेता घेता गरम गरम भजी, मक्याचे कणीस, कांदा भजी, गरमागरम चहाचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. तसेच यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. पवनानगर चौकात मोठी गर्दी झालेली दिसत आहे. तसेच पवना धरण परिसरात शनिवारी व रविवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी
By admin | Updated: July 3, 2017 02:57 IST