डोर्लेवाडी : झारगडवाडी (ता. बारामती) येथे १५ आॅगस्टनिमित्त झालेल्या ग्रामसभेमध्ये अनेक विषयांवर वादावादी झाली. ग्रामसभा संपायच्या आधीच गोंधळामुळे सरपंचांनी काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पंधरा आॅगस्टनिमित्त ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ग्रामसभेला तरुणांनी व ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. गावातील अंतर्गत रस्ते, गटारीवर केलेले अतिक्रमण, रस्त्यावरील अतिक्रमण, गावातील भुयारी गटाराचे चुकीच्या पद्धतीने सोडल्याबाबत अशा अनेक प्रश्नांवर युवराज बोरकर, गोरख बोरकर, पोपट कुलाळ यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना धारेवर धरले. सविस्तर उत्तरे न मिळाल्याने वादावादी झाली. यावर ग्रामसभा संपायच्या आधीच सरपंच निघून गेले. यामुळे आलेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांच्यासमवेत सभेला नवीन अध्यक्ष निवडून सभा पुढे सुरू ठेवली. ग्रामपंचायतीमध्ये २०१० ते २०१५ या सालामध्ये ४ लाख ३५ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. त्याचे काय झाले. त्या वेळी नेमणुकीवर असलेल्या गावडे ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी ज्ञानेश माने यांनी केली. या सभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रणजित बोरकर यांची निवड करण्यात आली. या वेळी सरपंच तुकाराम मासाळ, ग्रामसेवक कैलास कारंडे, सदस्य दादासाहेब बोरकर, पोपट कुलाळ, नारायण कोळेकर, उत्तम सपकळ, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल झारगड, नवनाथ देवकर, अजिनाथ बुरूगंले, अनिता लांडगे, ग्रामस्थ दादासाहेब झारगड, दिलीप बोरकर, राजेंद्र बोरकर, नीलेश कालगावकर, दादा तुपे, रसिक झारगड, शीतलकुमार मोटे, प्रवीण बोरकर, संजय जगताप, नितीन बोरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गोंधळामुळे सरपंचांचा ग्रामसभेतून काढता पाय
By admin | Updated: August 18, 2015 03:46 IST