बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून मागील 6क् वर्षापासून वंचित ठेवले आहे. आता नाही, तर कधीच नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत तरतूद केलेले आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आहे. आमचा लढा कोणा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर व्यवस्थाबदलासाठीचा लढा आहे, असे स्पष्टीकरण धनगर अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनी केले.
पंढरपूरहून निघालेली पदयात्र बारामतीत उद्या ( 21 जुलैला) बारामतीत धडकणार आहे. बारामती या राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या नगरीत सोमवारी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पाश्र्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार विजयराव मोरे, कृती समितीचे नेते अॅड. जी. बी. गावडे यांनी सांगितले, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची तरतूद आहे. तशी केंद्र शासनाकडे 1966 आणि 1979 मध्ये शिफारस केली आहे. 199क्मध्ये केंद्र शासनाने धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्याचे लेखी कळविले आहे. त्यामध्ये ‘धनगर’ आणि
‘धनगड’ हा शब्द एकच आहे, असा अभिप्राय दिला आहे. बिहार, ओडिशा, झारखंड या राज्यांनी खास तरतूद करून अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू केले आहे.
महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या समाजाचा सामाजिक विकास खुंटला असल्याचे सांगून मोरे म्हणाले, ‘‘आजही धनगर समाज रोजीरोटीसाठी शेळ्या-मेंढय़ापालनाच्या व्यवसायामुळे डोंगरद:यांत फिरत आहे. आरक्षणाची अंमलबजावणी केली असती, तर वेगळे चित्र दिसले असते. आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने समाजातील युवकांमध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे बारामतीत निर्धार सभा आयोजित केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राज्यभरातून आलेला धनगर समाज बारामतीतून हलणार नाही.’’
या वेळी कृती समितीचे नेते अविनाश मोटे, माणिकराव दांगडे पाटील, बापूराव देवकाते, वसंत घुले, डॉ. विजय कोकणो, गणपत आबा देवकाते, ज्ञानेश्वर बुरुंगले, विजय ठोंबरे आदी उपस्थित होते.
पंढरपूरहून निघालेली पदयात्र आज निमगाव केतकीत पोहोचली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते
महादेव जानकर, सहकारमंत्री
हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी या पदयात्रेत सहभागी झाली. (वार्ताहर)
निर्धार मेळाव्याची जय्यत तयारी
दरम्यान, आरक्षणाच्या सामाजिक लढय़ाच्या निमित्ताने बारामतीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. निर्धार मेळाव्याच्या ठिकाणाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरी’ असे नाव दिले आहे. तर, सभास्थानाला महात्मा फुले यांचे नाव दिले आहे. कृती समितीचे नेते हनुमंत सूळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, अॅड. जी. बी. गावडे, माजी आमदार विजयराव मोरे, विश्वासराव देवकाते, डॉ. शशिकांत तरंगे, मच्छिंद्र ठवरे, भगवानराव खारतुडे, मदनराव देवकाते, बापूराव देवकाते, विश्वनाथबुवा गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली 15 समित्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.
2क्क्9च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. निवडणूक झाल्यानंतर काहीच केले नाही. त्यांचा जाहीरनामा कागदावरच राहिला आहे. त्यांच्याच दारात येऊन आरक्षण मिळविण्याचा निर्धार केला आहे, असे गावडे व मोरे यांनी सांगितले.