बारामती : बारामती एसटी बस स्थानकात निळ्या रंगाच्या पिशवीत बॉम्ब ठेवल्याचा पोलीस ठाण्यात दूरध्वनी येतो.... पोलिस अधिकारी, कर्मचारी स्थानकाकडे धाव घेतात... काही मिनिटात संपूर्ण बसस्थानक रिकामे केले जाते.... जवळपास दोन तासाचा थरार... वाहतुकीची कोंडी... सायंकाळी लवकर घरी जाण्याची घाई असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील कुतूहल... संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी .. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी निळया रंगाची पिशवी जेसीबी यंत्राच्या हुकामध्ये अडकली.... आता त्यामध्ये काय असणार असे कुतूहल असणाऱ्या नागरीकांनी एसटी आगाराच्या ... स्पिकरवरून सांगण्यात येते... हे ‘मॉक्ड्रील’ होते. सहकार्या बद्दल धन्यवाद...हे वाक्य ऐकून सर्वांचा जीव भांडयात पडला. दरम्यान, बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारोच्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे बारामती-इंदापूर मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होती. मात्र, अचानक पोलिसांना बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, चंद्रकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर बसस्थानक रिकामे करण्यात आले. प्रवाशांना बसस्थानका बाहेर पाठविण्यात आले. त्यानंतर नगरपालिका प्रशासन, अग्निशामक दलाच्या मदतीने वाळूने भरलेल्या गोण्या बेवारस पिशवीभोवती ठेवण्यात आल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी बापू बांगर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी या ठिकाणी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने यावेळी मोठी सतर्कता बाळगली होती. मात्र, बारामती शहरात प्रथमच असा प्रकार घडला आहे. शहरात बसस्थानकामध्ये बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर सायंकाळी पुन्हा बसस्थानकाकडे गर्दी वाढली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण वाढला. आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेली सर्व सतर्कता बाळगण्यात आली. निळ्या रंगाच्या पिशवी जवळ वाळूच्या पिशव्या ठेवण्यात आल्या. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षणात पिशवी उचलून जेसीबी यंत्राच्या हुकमध्ये अडकवली. जेसीबीच्या द्वारे पिशवी तशीच पुढे नेण्यात आली. आता पुढे काय होणार, अशी उत्सूकता असताना पोलिसांनी जाहीर केले... हे ‘मॉक्ड्रील’ होते. सहकार्या बद्दल धन्यवाद... बेवारस वस्तूंच्या बाबत जागरूकता आहे का, यासाठी ‘मॉक्ड्रील’ केले, असे अतिरिक्त पोलिस अधिक्षक तानाजी चिखले यांनी जाहीर केले.
बारामतीत बॉम्बचा थरार...
By admin | Updated: August 22, 2015 01:58 IST