पुणे : कापूरव्होळजवळ अमृता गार्डन या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांच्या बॅगा आणि त्यातील लॅपटॉप, मोबाईल, आयकार्ड, रोख रक्कम तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेली. काल रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी संशय व्यक्त करूनही पोलीसांनी तातडीने कारवाई केली नाही. उमेश सरदार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सरदार यांच्यासह ‘लोकमत’चे तीन कर्मचारी काल रात्री गोवा येथे खासगी बसने (एमएच १४ सीडब्ल्यू ९६९) निघाले होते. पुणे-सातारा महामार्गावर अमृता हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. जेवण करून आल्यानंतर तीन प्रवाशांच्या बॅगा चोरीस गेल्याचे आढळून आले. उमेश प्रकाश सरदार यांची काळ्या रंगाची लेदरची बॅग, लॅपटॉपसह रोख ६ हजार रूपयाची रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे, सुषमा गौतम नायर यांची हॅन्डबॅग, दोन मोबाइल आणि शामल हिरालाल खैरनार यांची बॅग चोरून नेली. प्रवाशांनी याबाबत राजगड पोलीसांकडे संशय व्यक्त केला होता. मोबाईल सुरू असल्याने ट्रॅकींगद्वारे तपास करावा, अशी विनंती केली होती. मात्र, पोलीसांनी काहीही करण्यास टाळाटाळ केली. शेवटी सकाळी याबाबतची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. संबंधित प्रवासी कंपनीनेही प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. (वार्ताहर)
खासगी बसमधून बॅगा चोरीस
By admin | Updated: May 24, 2014 05:10 IST