कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वात जास्त आदिवासी समाज प्रभावित झाले आहेत. त्यांच्या साठी असणारी खावटी अनुदान योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सुरू केली जी योजना सन २०१३ पासून बंद करण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी आदिवासी विकास विभागातील सचिव, आयुक्त, अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन या योजनेची अंमलबजावणी सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यापासून कोणीही वंचित राहू नये, अशा सूचना केल्या. या योजनेत आदिवासी कुटुंबाला शासनाने ४००० रुपये अनुदान दिले जाते. रोख रक्कम २००० रुपये लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा होतात व २००० रुपयांचे जीवनावश्यक वस्तू मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, गोडेतेल, गरममसाला, मिरची पावडर, मीठ, चहा पावडर या वस्तू देण्यात येतात. जनसहारा वंचित आदिवासी फासेपारधी संघटना अध्यक्ष हिरालाल भाेसले यांनी सांगितले की, अजूनही बरेच कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत. आधार कार्डअभावी अनेकजण बॅंक खाते उघडू शकले नाहीत. आम्ही संघटनेच्या माध्यमातून अनेकांना आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मोफत धान्य यांचा लाभ करून दिला आहे. या खावटी योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही, त्यांना मिळण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. या योजनेत शिरूर तालुक्यात मदत पोहोच करून लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता एकूण १२ वाहने, २५ प्राथमिक शिक्षक, प्रत्येक ठिकाणी ५ मदतनीस यांनी तालुक्यात ९९३ कुटुंबाला मदत पोहोच केली. अध्यक्ष हिरालाल भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
आदिवासी कुटुंबाला खावटी योजनेअंतर्गत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:16 IST