मंगेश पांडे पिंपरीश्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसह त्यामधील लवाजम्यामुळे सोहळ्याला तितकीच भव्यता प्राप्त झाली आहे. याच सोहळ्यातील अश्व म्हणजे सोहळ्यातील वैभवतेचे प्रतीक मानले जाते. आषाढी वारीसाठी पंढरीला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात काळानुरूप बदल होत गेले. सुरुवातीला काही भाविकांसह पालखी पंढरीला नेली जात होती. चौघडागाडी, चोपदार, अश्व, हत्ती असा लवाजमा वाढत गेला. सोहळा अधिकाधिक भव्य कसा होईल, यासाठी संस्थानने पावले उचलली. सोहळ्यात सहभागी होत असलेल्या अश्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्व म्हणजे वैभवतेचे प्रतीक मानले जाते. सध्या सोहळ्यातही दोन अश्व आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पेठ बाभूळगाव येथील अश्व आहे. परंपरेप्रमाणे अनेक वर्षांपासून हा अश्व सोहळ्यात आहे. यावर तुकाराममहाराज स्वार असल्याचे मानले जाते. हा अश्व विनायक रणेर-बाभूळगावकर यांच्या मालकीचा असून, ते हा अश्व घेऊन येतात. यापूर्वी त्यांचे वडील नारायण रणेर घेऊन येत. पूर्वी हा अश्व बाभूळगावहून देहूला पायी आणला जात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाभूळगाव ते पंढरपूरपर्यंत अश्व वाहनाने आणतात. त्यानंतर पंढरपूरहून देहूपर्यंत हा अश्व पायी आणला जातो. अश्वासोबतच बाभूळगावातील माई दिंडीतील भाविक असतात. प्रस्थान सोहळ्याच्या बारा दिवस अगोदर अश्व व माई दिंडी पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होतात. परंपरेनुसार अनेक वर्षांपासून बाभूळगावकरांचा अश्व सोहळ्यात सेवा देत आहे. तुकोबाराय स्वार असल्याचे मानले जात असल्याने या अश्वाला ‘देवाचा अश्व’ असेही संबोधले जाते. या सोहळ्यात आतापर्यंत चार अश्व झाले. वयोमानानुसार ठरावीक कालावधीनंतर अश्व बदलण्यात आले. विशेष म्हणजे बाभूळगावकरांनी चारही अश्वांचे नाव ‘राजा’ हेच ठेवले. सध्याच्या अश्वाचे नावही ‘राजा’च आहे. सोहळ्यातील दुसरा अश्व अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांचा असतो. १९८३पासून हा अश्व सोहळ्यात दाखल झाला. दोन्ही अश्व प्रस्थान सोहळ्याच्या आदल्या दिवशी देहूत दाखल होतात.
पालखी सोहळ्यात ‘अश्व’ वैभव
By admin | Updated: July 7, 2015 02:57 IST