वडगाव आनंद (ता. जुन्नर) परिसरातील डोंगरमाथ्यावर असलेल्या मोरदरा येथील २०
लाख रुपये खर्चाच्या
पिण्याचे पाणी योजनेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.
वडगाव आनंदच्या पादीरवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावर असलेल्या ग्रामदैवत श्री कळमजाईमातेच्या मोरदरा येथील मोरदरा नागरिकांना अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या ठिकाणची लोकसंख्या तीनशेहून अधिक असून पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या परिसरात राष्ट्रीय पक्षी मोर तसेच इतर जंगली प्राणी यांचा वावर आहे.
उन्हाळ्यात भेडसावणारा हा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामपंचायतीच्या पादीरवाडी येथील पिण्याचे पाण्याच्या टाकीपासून मोरदरापर्यंत या पाणी योजनेसाठी
ग्रामपंचायत सदस्य डी. बी. वाळुंज यांनी पाठपुरावा सुरू केला. सरपंच शशिकांत लाड,
डी. बी. वाळुंज, सोमनाथ गडगे व सदस्य यांनी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, उपअभियंता कैलास टोपे व शाखा अभियंता दिगंबर गुजर यांच्या विशेष सहकार्यामुळे अखेर या २० लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. यामुळे डोंगरमाथ्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.