वाकड : सर्व नागरी समस्यांचे निराकरण त्वरित होण्यासाठी ग्रामपंचायत हिंजवडी आणि एका कंपनीच्या सहकार्याने ‘गांधीगिरी’ नावाचे मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. परिसरातील रहिवाशांच्या वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, आरोग्य, वैद्यकीय, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, वाहतूक आदी पायाभूत आणि नागरी सुविधांबाबत समस्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या नजरेस आणून देत त्यावर ‘झट की पट’ उपाययोजना होणे शक्य होणार असल्याचे सरपंच श्याम हुलावळे यांनी सांगितले. बऱ्याचदा नागरी सुविधांसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाच्या दरबारी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे समस्या सुटत नाहीत. याचाच विचार करून धावपळीच्या काळात नागरिकांचा वेळही वाचावा आणी कामही त्वरित व्हावे, तसेच संपूर्ण गाव एकमेकाशी जोडले जाते, या हेतूने या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपवर समस्यांबाबत उपाययोजना काय करण्यात आल्या आहेत, काम कसे आणी कधी होणार याबाबत एका क्लिकवर सदस्याला कळणार आहे.सभासद होण्यासाठी ‘गांधीगिरी’ अॅप डाऊनलोड करावा लागतो. सभासद झाल्यानंतर शाळा, रस्ते, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय इत्यादी कोणत्याही गोष्टीशी निगडीत ग्रुप तयार करून त्यावर समस्या सोडविणारी संबधित व्यक्ती विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आपण केलेल्या कामाची प्रगती कुठपर्यंत आली कामात काय अथवा लागणारा कालावधी पाहता येऊ शकतो.(वार्ताहर)
समस्या निवारणासाठी अॅप
By admin | Updated: June 15, 2015 06:06 IST