पुणे : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले. आता दीड महिना शिल्लक राहिला असताना शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्याचा प्रस्ताव घाईघाईने आणण्यात आला आहे. अजून गणवेश न देऊ शकलेल्या प्रशासनास टेंडर प्रक्रिया राबवून रेनकोटचे वाटप करण्यापूर्वी पावसाळा संपून जाणार हे निश्चित आहे. रेनकोट खरेदीचा प्रस्ताव काही सभासदांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावावर प्रशासनाचा अभिप्राय मागविला आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यावर निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाने या प्रस्तावावर अनुकूल अभिप्राय द्यावा याकरिता काही माननीयांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. शाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर मिळू शकलेले नाही. सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळण्यासाठी किमान आणखी एक महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. गणवेशाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यासाठीचे गणवेश खरेदीचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.रेनकोटची खरेदीसाठी जाहिरात काढून निविदा प्रकिया राबवावी लागेल. त्यानंतर ठेकेदाराला ८० हजार रेनकोट उपलब्ध करून देण्यासाठी एक -दोन महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. म्हणजे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हातात रेनकोट पडेपर्यंत पावासाळा संपलेला असेल. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना पावसाळ्यानंतर रेनकोट देण्याचा घाट
By admin | Updated: August 17, 2015 02:30 IST